सिंधुदुर्गात यंदाही हळद लागवड अभियान होणार का ? शेतकरी आहेत प्रतीक्षेत

मागील वर्षी भाजपाच्या “सिंधू आत्मनिर्भर” अभियानाने हळद लागवडीला दिले होते प्रोत्साहन; यावर्षी बियाणांची वाढलेली किंमत शेतकऱ्याला न परवडणारी : “सिंधू आत्मनिर्भर” अभियान कोरोना काळात शेतकऱ्यांना ठरू शकत आशादायी  

कुडाळ : “सिंधू आत्मनिर्भर” अभियानाच्या माध्यमातून मागील वर्षी १५ हजार किलो बियाणांचे मोफत वाटप जिल्ह्यात करण्यात आले होते. जिल्ह्यातील सक्षम महिला बचतगट आणि शेतकऱ्यांना हे हळद बियाणे पोहोचविण्यात आले. यातून भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा हळदीचे मार्केट हॊईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला होता. गतवर्षी झालेल्या या उपक्रमामुळे कोकणातील शेतकरी हळद उत्पादनात आघाडी घेऊ शकला होता. हळदीमधून चांगले उत्पादनही शेतकऱ्यांनी मिळवलं होत. सिंधू आत्मनिर्भर अभियान अंतर्गत अतुल काळसेकर यांनी यात पुढाकार घेतला होता. यावर्षी जून महिना सुरू झाल्याने हे अभियान पुन्हा राबविले जाणार की नाही याबाबत शेतकरी अनभिन्य आहेत. खरेतर जे हळद बियाणे गेल्यावर्षी सिंधू आत्मनिर्भरने मोफत दिले होते त्याची यावर्षी किलोची किंमत १०० रुपये आहे. आधीच कोकणातील शेतकरी कोरोनामुळे भरडला गेला आहे. त्यामुळे १०० रुपये किलोने हे बियाणे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळेच सिंधूआत्मनिर्भरच अभियान शेकऱ्यांना महत्वाचे ठरू शकेल.
मागील वर्षी जिल्हाभरात ३५ ते ४० टन हळदीची लागवड झाली. विक्रीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर हळद उपलब्ध झाली नसली तरी स्वतःच्या घरगुती वापराकरिता मुबलक हळद पावडर तयार झाली. सिंधू आत्मनिर्भर अभियान आणि माणगांवच्या डॉ. हेडगेवार प्रकल्पाने हळकुंडावर प्रकिया करून हळद पावडर बनविण्यासाठीची यंत्रणा उभी केली. त्यामुळे आपल्या वापराव्यतिरिक्त पिकणारी हळद प्रक्रिया करून त्याच्या विक्रीची व्यवस्था जिल्ह्यातच उभी राहिली.    
याबाबत “सिंधू आत्मनिर्भर” अभियान प्रमुख अतुल काळसेकर यांनी यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. यंदा जिल्ह्यात शेतकरी भात पिकांबरोबरच हळद लागवडीबाबत इच्छुक आहेत. मात्र, यासाठी आवश्यक असणारे बियाणे सांगली जिल्ह्यातून ८० ते १०० रुपये किलोने उपलब्ध होते. बियाणांची ही किंमत येथील शेतकऱ्यांना परवडणारी नाही. मागील वर्षी हळद हमीभाव देवून खरेदी करण्यात आली. अजून येथील शेतकऱ्याकडे हळद बियाणे उपलब्ध नाही. मात्र, पुढील दोन वर्षात जिल्ह्यात ५०० एकर जमिनीवर हळद लागवड होईल; त्यानंतर आपल्याकडचेच बियाणे आपल्याला बियाणे उपलब्ध होईल. म्हणजेच शेतकऱ्याचा बियाण्यावरील खर्च शून्य होईल.  
   परंतु, यावर्षी वादळाच्या पार्श्वभूमीवर पाऊस लवकर सुरू झाला असून येत्या दोन आठवड्यात ही लागवड पूर्ण होणे अपेक्षित आहे. हळद क्रांतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना सिंधू आत्मनिर्भर अभियान अंतर्गत बियाण्याचा माफक दर आणि त्यानंतर हळद पावडरच्या खरेदीचा हमीदराबाबत दिलासा देण्याची गरज आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: