सिंधुदुर्गातील आडाळी प्रकल्पावरून महाविकास आघाडीत पुन्हा वादाची ठिणगी

​सिंधुदुर्ग : केंद्रीय आयुष मंत्रालयाने दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे मंजूर केलेल्या एन.आय.एम.पी प्रकल्पावरून राज्यातील महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंजूर झालेला हा प्रकल्प काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख लातूरला पळवत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. स्व. विलासरावांच्या अंगी असलेला दिलखुलासपणा अमित देशमुख यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला विनायक राऊत यांनी दिला आहे.
       केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रयत्नातून दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे एन.आय.एम.पी प्लांट हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने केंद्र सरकारने राज्य सरकार कडून अभिप्राय मागवला होता. यावर राज्य सरकारच्या वतीने हा प्रकल्प सिंधुदुर्ग ऐवजी लातूरला साकारण्याचा प्रस्ताव अमित देशमुख यांच्या सहीने केंद्राला पाठविण्यात आल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर आपण स्वतः सातत्याने अमित देशमुख यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला. पालकमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा या भेटीसाठी प्रयत्न केले. मात्र अमित देशमुख यांनी आपल्याला भेट दिली नाही. याबाबत कोणतीही चर्चा न करता हा प्रकल्प लातूरला पळविण्याच्या घटनेचा आपण निषेध करत असल्याची प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे. अमित देशमुख हे स्व. विलासरावांचे सुपुत्र आहेत. विलासरावांच्या अंगी असलेला दिलखुलासपणा त्यांनी अंगीकारण्याचा प्रयत्न करावा, अशी प्रतिक्रिया खा. विनायक राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे महाविकासआघाडी मधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून हा प्रकल्प आडाळीमध्येच होण्यासाठी विनायक राऊत यशस्वीही ठरणार की वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हा प्रकल्प लातूरला घेऊन जाणार ? याकडे आता सिंधुदुर्गवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ​, ​सिंधुदुर्ग​​. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: