वाढत्या उत्पादन खर्चामुळे चिरे दरवाढ

आचरा दशक्रोशी चिरेखाण व्यावसायिक संघटनेच्या बैठकीत निर्णय

आचरा : वाढते इंधनभार, वीज बील, मजूरी, राँयल्टी मध्ये झालेली वाढ याचा फटका चिरेखाण व्यावसायिकांना बसत असून चिरेखाणी पासून सुमारे वीस किलोमीटर परिसरात चिऱ्याचा दर पंचवीस रुपये प्रती याप्रमाणे देण्याचा ठरला आहे याबाबत ग्राहकांनी, व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आचरा दशक्रोशी चिरेखाण व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाबू हडकर यांनी केले आहे. आचरा दशक्रोशी चिरेखाण व्यावसायिक संघटनेची सभा बाबू हडकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी आचरा येथे संपन्न झाली. यावेळी सचिव दुर्गा प्रसाद तुळपुळे, विकास हडकर, अजय साटम, प्रकाश मेस्त्री, निलेश कांबळी, नितीन गायतोंडे, निलेश पांजरी आदी चिरेखाण व्यावसायिक उपस्थित होते. या बैठकीत वाढलेल्या राँयल्टी व इंधन दरवाढीमुळे व्यवसाय करताना आर्थिक फटका बसत आहे. कामगारांची मजूरी ही वाढली आहे. यामुळे सद्य स्थितीत चिऱ्याचा दर वाढविणे आवश्यक बनला आहे. याबाबत चर्चेअंती सर्वानुमते वीस किलोमीटर परीसरात प्रती चिरा पंचवीस रुपये दराने देण्याचे ठरविण्यात आले. यासाठी ग्राहकांनी, समव्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

अर्जुन बापर्डेकर, कोकण नाऊ, आचरा

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: