लवकरच पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी ईकॉलॉजीकल टास्क फोर्स

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी हतबल होत असून शेतीकडे पाठ फिरवत आहेत. हत्त्ती, डुक्कर, माकड, गवारेडे, वनगाय, शेकरू इत्यादी प्रकारचे वन्य प्राणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून हे प्राणी सध्या जंगल भाग सोडून गावातील लोकवस्ती पर्यंत येऊन नुकसान करत आहेत. यावर चर्चा करून उपाय योजना आखण्यासाठी माजी खासदार ब्रिगे.सुधिर सावंत यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या दालनामध्ये जिल्हा वन अधिकारी नारनवर व कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर, शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत यांचा उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सिंधुदुर्गमध्ये लवकरच पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी ईकॉलॉजीकल टास्क फोर्स स्थापन करणार आहे असे ब्रिगे. सुधिर सावंत यांनी जाहीर केले. वन्य प्राणी वस्ती पर्यंत येऊन शेतीचे नुकसान करतात हे टाळण्यासाठी जंगलमय अति भागात जिथे वन्य प्राण्यांची वस्तीस्थाने आहेत तिथे फळझाडांच्या बियांचे टोकण करण्यात येणार आहे. ही मोहीम १५ मे ते ३० जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ईकॉलॉजीकल टास्क फोर्सच्या माध्यमातून व वनखात्याच्या सहकार्यातून ही मोहीम घेण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात फळझाडे, वड, पिंपळ, बेलडामाड, माणगा बांबू या सारख्या वनस्पतींची लागवड जंगलमय भागात करण्यात येणार आहे असे ते म्हणाले. कृषि विज्ञान केंद्र, महाविद्यालये, एन.सी.सी., एन. एस. एस., सर्व सेवा भावी संस्था इत्यादींच्या माध्यमातून मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येईल व त्यासाठी सरकारची मदत घेण्यात येईल. यावेळी जिल्हा वन अधिकारी नारनवर यांनी सर्वतोपरी सहकार्य करणार असून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या मोहिमेसाठी शासनाकडून योग्य ती मदत करण्यात येईल असे सांगितले. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर उपस्थित होते. वेस्ट आफ्रिकेवरून कृषि विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या आफ्रिकन प्रतिनिधी अन्नामारीया व जौन्ना गोन्सालवेस उपस्थित होत्या. तसेच कृषी प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र डोंगरे, शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत, डॉ.सोनाली पावसकर, प्रा.सुभाष बांबुळकर, दिपक सावंत उपस्थित होते

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्गनगरी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: