“माझी शाळा माझा किल्ला” स्पर्धेचे कणकवली पंचायत समितीच्या वतीने आयोजन

सभापती मनोज रावराणे यांची माहिती

10 ते 19 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आले आहे आयोजन

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कणकवली पंचायत समितीच्या वतीने ” माझी शाळा माझा किल्ला ” उपक्रमांतर्गत सहयाद्रीचे छोटे मावळे-किल्ले बनवा स्पर्धा सन २०२१ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती सभापती मनोज रावराणे यांनी दिली.
गड-किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. किल्ले हे पराक्रमाची आणि संघर्षाचे प्रतिक आहेत. छ. शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमी स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेचविद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला तसेच कौशल्याला वाव मिळावा आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा असलेले किल्ले त्यातील स्थापत्य कलेचे महत्व त्यांना समजावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक वास्तूंचे योग्यरितीने जतन आणि संवर्धन व्हावे , जनजागृती व्हावी या उददेशाने आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सभापती मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून आणि सर्व पंचायत समिती सदस्य तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना आणि परीक्षा समिती कणकवली यांच्या सहकार्यातून पंचायत समिती कणकवलीच्या वतीने शिवजयंती २०२१ निमित्त “माझी शाळा माझा किल्ला” या विशेष उपक्रमाचे १० फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे . या उपक्रमांतर्गत कणकवली तालुकास्तरीय “सहयाद्रीचे छोटे मावळे-किल्ले बनवा स्पर्धा २०२१” चे आयोजन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात पहिल्यांदाच शाळांमधून अशाप्रकारे किल्ले बनविणे स्पर्धा होत आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांना सहभागी होता येईल.
या स्पर्धेत सहभागी होणे ऐच्छिक असेल तरी प्रत्येक शाळेने सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. पाच प्रभागातून निवडलेली प्रत्येकी पहिल्या तीन क्रमांकांना विशेष समारंभात आमदार नितेश राणे यांचे हस्ते गौरविण्यात येईल आणि सर्व सहभागी शाळांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात येईल. सहभागी शाळांनी किल्ले बनविताना शाळेसमोर दर्शनी भागात ८ फूट बाय ६ फुट जागेत किल्ला बांधावा. किल्यासाठी कागद, कापड, जुने गोणपाट, दगड, विटा, माती, नैसर्गिक रंग, पाने चुना लाकूड, रांगोळी लाकडाचे/मातीचे पुतळे, तोफा यासारख्या वस्तूंचा वापर करावा. किल्ल्यासाठी थर्माकॉल , प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा प्लास्टिक यांचा वापर करू नये. किल्ला महाराष्ट्रातील असावा. तसेच किल्याची प्रतिकृतीहुबेहूब असावी समोरून किंवा हवाई छायाचित्र घेतले असले तर ते प्रत्यक्ष किल्ल्याशी साम्य असावे. विद्यार्थ्यांद्वारे किल्ल्याची महती, माहिती आणि इतिहास सांगणारे सादरीकरण ऑनलाइन स्वरूपात करण्यासाठी ३ ते ४ मिनिटांचा व्हिडिओ बनविण्यात यावा. या उपक्रमांतर्गत खालीलप्रमाणे १० फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत शाळेत प्रत्यक्ष किल्ला बांधणे दि. १८ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या दरम्यान स्पर्धेत सादरीकरणासाठी व्हिडिओ बनविणे, १९ फेब्रुवारी रोजी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करणे, २० फेब्रुवारी ते दि. २२ फेब्रुवारी दरम्यान प्रभागस्तरीय मूल्यमापन वतालुक्यातील तीन क्रमांक पाठविणे, असे नियोजन करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: