माजी सभापती आबा रावराणे काळाच्या पडद्याआड

वैभववाडी : गगनबावडा तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सभापती, वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. 2 गावचे माजी सरपंच बाळकृष्ण रावराणे उर्फ आबा रावराणे (90) यांचे गुरुवारी निधन झाले ! त्यांच्या निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. एक प्रामाणिक आणि सेवाभावी व्यक्तिमत्वाला गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
वैभववाडी आणि गगनबावडा तालुक्यातील राजकरण आणि समाजकारणात काही जण स्वकर्तृत्वाने पुढे आले आणि निस्वार्थीपणाने जनतेची सेवा केली. त्यापैकी माजी सभापती आबा रावराणे यांचे नाव घेतले जाते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याला तळकोकणातील 37 आणि वरघाटाची 40 गावे जोडली गेलेली होती. 1960 साली पंचायत राज्य अस्तित्वात आले.ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेचा कारभार सुरु झाला. त्यानंतरच्या काळात आबा रावराणे, आप्पा रावराणे, यशवंत रावराणे आणि मानाजी गुरव ही मान्यवर मंडळी पंचायत समितीचे सभापती झाले. भोमचे भाऊ सावंत, कुसूर गावचे रामभाऊ पाटील, नेर्ले गावचे श्रीधर खानविलकर यांनी गगनबावडा पंचायत समितीचे उपसभापती पद भूषविले. त्या काळात हरिभाऊ दळवी हे पंचायत समितीवर निवडून आले होते. यांनी वैभववाडीतील ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्न केले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या नेतृत्वाने वैभववाडी तालुक्याला नेहमीच दुय्यम स्थान दिले. रावराणे आपल्या दबावाखाली काम करणार नाहीत. वेळप्रसंगी आवाज उठवतील हे गृहीत धरून महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत किंवा पदांच वाटप करताना डावललं जात असे. मात्र, आपला स्वाभिमान कर्तव्य बजावत काम करताना आबा रावराणे, यशवंत रावराणे, मानाजी गुरव ही सर्व मंडळी वैभववाडीच्या विकासासाठी आवाज उठवीत असत. वैभववाडी तालुक्याच्या विकासकामात या लोकांचा सिहांचा वाटा आहे.
वैभववाडी शहराचे शिल्पकार के. गो. रावराणे हे गगनबावडा सरकारी कार्यालयात जात तेव्हा त्यांना मानाचे स्थान दिले जायचे. त्यांच्याविषयी खूप आदर होता. ते खूप शिस्त प्रिय होते. या लोकांचा गगनबावडा सरकारी कार्यालयात वचक, दबदबा आणि दरारा होता. त्याचबरोबर दाजी सावंत, मागवलीचे डॉ. आप्पासाहेब पाटील, कोकिसरे येथील शांताराम नारकर, करुळचे दत्ताराम कोलते, भुईबावडा येथील नव्या पिढीतील विजय नारकर, आचिर्णे येथील पांडुरंग भगवान रावराणे, ऐनारीचे भाऊ बळीराम विचारे ही मंडळी त्या काळात नावारूपाला आली. वैभववाडी तालुक्याच्या विकासात या लोकांचा कठीण काळातही मोठे योगदान आहे. ते कधीच विसरता येणार नाही.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, वैभववाडी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: