महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील ऐतिहासिक साक्षीदार हरपला; ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महत्त्वाचे शिलेदार दिनू रणदिवे यांचं आज (दि.१६ जून) वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील मान्यवर व नव्या पिढीतील तरुण पत्रकारांचा त्यांच्या घरी नेहमी जाणे-येणे होते. सर्वांशी ते संवाद साधत होते. मार्गदर्शन करत होते. अनेकांना अभ्यासासाठी संदर्भ देत होते. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. वयोमानामुळं त्यांच्या हिंडण्याफिरण्यावर मर्यादा आल्या होत्या. पण तरी त्यांचं काम सतत सुरू होतं.

डहाणूतील आदिवासीबहुल भागात १९२५ मध्ये जन्मलेल्या रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेआधी पत्रकारितेला सुरुवात केली. एका ध्येयानं पत्रकारितेत आलेल्या रणदिवे यांचा अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग राहिला होता. १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने छेडलेल्या गोवा मुक्ती संग्रामात ते सक्रिय होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. या लढ्यात त्यांनी डांगे, आचार्य अत्रे यांच्यासोबत कारावासही भोगला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ साली सुरू केलेल्या संयुक्त महाराष्ट्र पत्रिका नावाच्या अनियतकालिकातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली होती. नंतर अनेक वर्षे त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये मुख्य वार्ताहर म्हणून काम पाहिले. १५ सप्टेंबर १९८५ रोजी ते मटातून निवृत्त झाले, तोपर्यंत त्यांनी वार्तांकनात महत्त्वाचे अनेक मापदंड घालून दिले. १९७२ मध्ये रणदिवे यांनी केलेले बांग्लादेश मुक्तिलढ्याचे वार्तांकनही गाजले होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र पत्रिका व लोकमित्र या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले होते. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी रणदिवे यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: