प्रचार-प्रसिद्धीसाठी कृषी रथाचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ…

सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्ह्यात १ ते १५ डिसेंबर या कालावधीत कृषीरथ कार्यरत राहणार असून या कृषी रथाला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करण्यात आला.

प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्धी / उन्हाळी हंगाम २०२१ मध्ये राबविणेसाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजना शासन इफको टोकीयो जनरल इन्श्युरन्स कंपनीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

उन्हाळी भात व उन्हाळी भुईमुग पिके घेणा-या शेतक-यांना काढणीपश्चात हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास सदर विमा कंपनीकडून नुकसान भरपाई प्राप्त होणार आहे. ३१ मार्च २०२२ अखेर पर्यंत सदर पिकांसाठी विमा हप्ता भरण्याची मुदत असून उन्हाळी भात पिकाकरीता प्रति हे. रक्कम रु ५०५/- व उन्हाळी भुईमुग पिकाकरीता प्रति हेक्टरी रक्कम रु ६००/- एवढा विमा हप्ता शेतक-यांनी भरावयाचा आहे. विमा संरक्षण रक्कम रु ५३०००/- उन्हाळी भात पिकासाठी असून रक्कम रु ४००००/- उन्हाळी भुईमुग पिकासाठी निश्चित करण्यात आलेली आहे.

सदर योजने बाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी दि. १ डिसेम्बर ते १५ डिसेम्बर या कालावधीत कृषिरथाद्वारे तालुका स्तरावरील विमा कंपनीचे तालुका प्रतिनीधी व कृषि विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी विमा योजनेबाबत विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. जेणेकरुन अधिसुचित ठिकाणचे हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास शेतक-यांना त्याचा मोबदला मिळू शकणार आहे.

सदर कृषिरथाला आज जिल्हास्तरावर हिरवा झेंडा दाखवून व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस एन म्हेत्रे यांनी केले आहे. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीतील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमास तंत्र अधिकारी कांबळे, जिल्हा सल्लागार अरुण नातू, तसेच कृषि अधिकारी हडकर, खोराटे घाडी, पुनम कोलते राही जाथव स्मिता काळप तसेच विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनीधी श्रीम. धनराज उपस्थित होत्या.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, सिंधुदुर्गनगरी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: