पुण्यात महिलांचे रिकामी हांडे घेऊन गरबा डान्स आंदोलन 

पुणे: एकीकडे पावसाने लोकांच्या तोंडचं पाणी पळवलंय तर एकीकडे लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. पुणेकरांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलने होत असतात. पुण्यात सध्या रिकामी हंड्यांच्या गरब्याचे आंदोलन झाले. दसऱ्याचा सण तोंडावर असताना घरात पाण्याचा थेंबही नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या दीड वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याचा निषेध म्हणून बोपोडीतील महिलांनी सोमवारी महापालिकेवर हंडामोर्चा काढत पालिकेच्या आवारात रिकामी हंड्यानी गरबा खेळला आणि आपला नवरात्र उत्सव साजरा केला. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी हा हंडामोर्चा थांबवला. आचारसंहितेमुळे महापालिका प्रशासनाचे नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचाच फटका नागरिकांना बसत असून अनेक रस्त्यांना खड्डे पडलेत, तर अनेक भागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी बोपोडीतील महिलांनी थेट महापालिकेवर हल्लाबोल केला.
         बोपोडी प्रभाग क्रमांक आठमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. अनेकांच्या नळांना पाणी येत नाही. नळाला पाणी आले तरी अतिशय कमी दाबाने येते. सणासुदीच्या काळातही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाला ही बाब लक्षात आणून देण्यासाठी, तसेच हक्काचे पाणी लवकर मिळावे, या मागणीसाठी स्थानिक नगरसेविका सुनीता वाडेकर यांच्या नेतृत्वात जवळपास १०० महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा नेला. तिथे महात्मा फुले पुतळ्याजवळ घेर करत मोकळ्या हंड्यानी दांडिया खेळला. पालिकेच्या पायऱ्यांवर बसून प्रशासनाविरोधात घोषणा देत पाणी देण्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्ते परशुराम वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे आदी उपस्थित होते. 

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, पुणे.  

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: