नगरसेवक दीपक पाटकर यांचा असा ही एक आदर्श

मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबाची असलेली हलाखीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मालवणचे नगरसेवक दीपक पाटकर यांनी पुढाकार घेत सर्व मदतकार्य केल्याने अखेर शुक्रवारी रात्री मालवण चिवला बीच येथील स्मशानभूमीत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मालवण शहरात ग्रामीण भागातून येऊन गेल्या काही वर्षांपासून एक दाम्पत्य मोलमजुरी करून राहत होते. काही महिन्यांपासून त्या दाम्पत्यापैकी पत्नी आजारी पडली.ओरोस, बांबुळी रुग्णालयात उपचार करूनही आजार बळावत होता. होते नव्हते ते सर्व पैसे संपले. अखेर गेल्या काही दिवसांपासून मालवण ग्रामीण रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी त्या महिलेचे निधन झाले. पतीवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यात हातात पैसेही नाहीत, कोणी नातेवाईकही नाही. पुढे करायचे काय पत्नीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार तरी कसे करायचे या विचारात पती होता. दरम्यान, आपल्याला पत्नीच्या आजारपणात काहीवेळा मदत करणाऱ्या नगरसेवक दीपक पाटकर यांना पत्नीच्या निधनाची माहिती देण्याबाबत कळवले. माहिती मिळताच दीपक पाटकर तात्काळ रुग्णालयात पोहचले. त्या व्यक्तीला धीर देत आपण सगळी व्यवस्था करतो तुम्ही काळजी करू नका हा शब्द पाटकर यांनी दिला. कर्मचाऱ्यांना बोलावून मृतदेह रुग्णवाहिकेतून चिवला बीच स्मशानभूमीत नेण्यात आला. त्याठिकाणी अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था करून मृतदेहावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुबेर खान, कोकण नाऊ, मालवण

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: