दळवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे येथील प्रधान कार्यालयाला भेट

खारेपाटण : तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार दि. १४ रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे येथील प्रधान कार्यालयाला भेट दिली. यावेळी महाविद्यालयातील बीबीआय व बीएससी आयटी अभ्यासक्रमाच्या एकूण ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
दळवी महाविद्यालयाच्या बीबीआय व बीएससी आयटी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा पुणे येथे औद्योगिक क्षेत्र भेट व अभ्यासदौरा काढण्यात आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आणि दळवी महाविद्यालय यांच्यात झालेल्या करारानुसार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बँकेकडून ऑनलाईन व ऑफलाईन कामकाजाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य कार्यालयातून इतर शाखांवर कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जाते, बँकिंग परीक्षा पास झाल्यानंतर प्रशिक्षण कसे आणि कोठे दिले जाते. याचे ज्ञान बँक ऑफ महाराष्ट्रकडून देण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रधान कार्यालयाला भेट देण्यात आली.
महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक प्रा. विनायक दळवी यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देऊन रोजगार देण्यावर भर दिला आहे. त्याच अनुषंगाने ही क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील विविध अंगे समजून घेता आली. मार्केटींग आणि मीडिया मॅनेजर दत्ता आफळे यांनी सर्व कामकाज समजावून सांगितले. त्याचबरोबर नवनीत किनगे आणि श्री शेख यांनी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. याशिवाय श्री ऋषिकेश, श्री किशोर व श्री विवेक यांनी इन्शुरन्स, सोशल सिक्युरिटी स्कीम यांची माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील इत्यंभूत ज्ञान प्राप्त झाले.
यावेळी दळवी महाविद्यालयाचे सहा. प्रा. नितीश गुरव, सहा. प्रा. सुप्रिया जाधव, सहा. प्रा. प्रसाद धुरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ, खारेपाटण.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: