तुकाराम बीज पासून सुरू होतोय आचरा पिरावाडी येथील गाबित समाजाचा होळी उत्सव

आचरा :

सकाळच्या रांबाय पारात… पारात
पिंगलो जोशी दारात.. दारात
आका माका पैसो घालता हा घालता हा
पेटयेक चावी लावता हा लावता हा
घरात कोण पावणे दोन …
शबय.. शबय… शबय..!

पहाटे साडेचार पासूनच लहान थोर मंडळी डबा वाजवत गाणं म्हणत एकमेकांच्या घरी फिरून शबय मागत होती. तुकाराम बीज पासून सुरू होणाऱ्या आचरा पिरावाडी येथील गाबित समाजाच्या होळी उत्सवाची ही अनोखी प्रथा आजही मोठ्या उत्साहात पाळली जात आहे. सर्व धर्मियांना सामावून घेऊन वाडीचा एकोपा साधणारा हा गाबित समाजाचा होळी उत्सव पाच दिवस साजरा केला जातो. या उत्सवाची सुरुवात होळीच्या तिसऱ्या दिवशी तुकाराम बीज पासून होते. या दिवशी पहाटेच उठून गाणे म्हणत शबय मागितली जाते. या नंतर सायंकाळी कोळीण (नाच्या) समवेत वाडीतील सर्व ग्रामस्थांसह एकत्र येत श्री देव चव्हाटा येथे घुमट वादन करत नृत्य गायन केले जाते.

आनंदी आनंद झाला गा थोर, आनंदी आनंद झाला बा….

गाणे घुमट वाद्यांच्या साथीने म्हणत गाउडवाडी येथील ब्राम्हणदेव मंदिरासमोरील होळी, देवूळवाडी येथील देव होळी यांना भेट देत रवळनाथ मंदिर, रामेश्वर मंदिरात कोळीण नृत्य गायन केले जाते. गावचे ग्रामोपाध्याय सरजोशी यांच्या घरी जाते या नंतर बौद्ध वाडी येथे समाज मंदिरासमोर, भंडारवाडी येथील होळीला भेट देऊन रात्री चव्हाट्यावर परतते. दर रात्रौ घुमट वादनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा प्रकारे पिरावाडी येथील गाबित समाजाची होळी साजरी केली जाते. या वर्षी बुधवार ११ मार्च ते १६ मार्च पर्यंत रंगणाऱ्या होळीनिमित्त ग्रामोन्नती मंडळ आचरा – पिरावाडी तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार ११ मार्च रोजी पहाटे ३:०० वाजल्यापासून सकाळी ६:३० पर्यंत संत तुकाराम बिज साजरी केली गेली. सायंकाळी ४:०० वाजता मांड उभा करण्यात आला आणि त्यानंतर श्री देव चव्हाटा, श्री देव रामेश्वर भेटीसाठी रवाना झाले. ब्राम्हणदेव गावुडवाडी, होळदेव देवूळवाडी, श्री देव रामेश्वर मंदिर देवूळवाडी, श्री रवळनाथ मंदिर देवूळवाडी, आचरा ग्रामोपाध्याय निलेश सरजोशींच्या घरी, नंतर बौद्ध वाडी येथील चाळ्याला भेट देत रात्रौ ८:३० नंतर श्री देव चव्हाट्यावर येतात. रात्री ९:३० वाजता श्रीकृष्ण सेवा मंडळ कृष्णनगर यांचे घुमट वादन, १०:०० वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. गुरुवार १२:०० मार्च रोजी रात्री ९:३० वाजता विठ्ठल समाज विकास मंडळ उत्तरवाडा यांचे घुमट वादन, १०:०० वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रम, शुक्रवार १३:०० मार्चला रात्री ९:३० वाजता तरूण संघ दक्षिणवाडा यांचे घुमट वादन, १०:०० वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रम, शनिवार १४ मार्चला सकाळी १०:०० ते १:०० व दुपारी ३:३० ते ७:३० गाव मागणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९:३० वाजता मधलावाडा ग्रामस्थसभा पिरावाडी यांच घुमट वादन, १०:०० वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. रविवार १५ मार्चला सकाळी १०:०० ते १:०० व दुपारी ३:३० ते ७:३० गावमागणी कार्यक्रम होणार आहे. रात्री ९:३० वाजता सर्व ग्रामस्थांचे एकत्रीत घुमट वादन, १०:३० वाजता मान्यवर सत्कार सोहळा, ११:०० वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. रात्री १२:०० वाजता पारंपरिक कार्यक्रम पचिक घालणे हा कार्यक्रम होणार आहे. दि. १६ मार्च रोजी पहाटे ५:०० वाजता घुमटवादन, भुपाळी, आरती केली जाणार आहे. सकाळी ७:०० वाजता गुलाल उधळून कार्यक्रमाची सांगता केली जाईल. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अर्जुन बापर्डेकर, कोकण नाऊ, आचरा.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: