तळेरे येथील लोखंडी रस्ते मार्गदर्शक कमान व त्यावरील फलकांची दुरावस्था–गंभीर अपघाताची शक्यता

तळेरे – कोल्हापूर राज्य मार्गावरील तळेरे येथे उभारण्यात आलेली रस्ते मार्गदर्शक लोखंडी कमान व त्यावरील फलक कोसळून पडण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे गंभीर अपघात होण्याची दाट संभावना निर्माण झाली आहे. असे असतानाही संबधीत रस्ते विभागाचे मात्र याकडे सर्वस्वी दुर्लक्षच होत आहे. याची तातडीने गंभीर दखल घेऊन कोसळण्याच्या स्थितीत असलेली व गंभीर अपघातास कारणीभूत ठरू पाहणारी सदरची दुर्दशाग्रस्त रस्ते मार्गदर्शक लोखंडी कमान व त्यावरील फलक यांची योग्य ती देखभाल दुरुस्ती तात्काळ संबंधित रस्ते विभागाने करावी अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी केली आहे.
तळेरे – कोल्हापूर राज्य मार्गावरील तळेरे येथे बांधण्यात आलेल्या लोखंडी कमानीची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. रस्ते मार्गदर्शक लोखंडी कमानीचे दोन्ही पिलर गंजलेले आहेत. तसेच या कमानीवर बसविण्यात आलेले फलकांचे पत्रे तुटून खाली लोंबत आहेत. हे लोंबत असलेले पत्रे खालील रस्त्यावरून ये – जा करणारी वाहने व पादचारी माणसे यांच्यावरती कधीही कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तळेरे – कोल्हापूर या मार्गावरुन कोल्हापूर, सांगली, सातारा, प.महाराष्ट्र तसेच पुणे, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावरती वर्दळ असते. तसेच तळेरे हे मुंबई – गोवा व कोल्हापूर मार्गे पुणे – मुंबई या मार्गांवरील महत्वाचे वर्दळीचे ठिकाण समजले जाते. त्यामुळे तळेरे – कोल्हापूर मार्गावरील तळेरे येथील दुर्दशाग्रस्त रस्ते मार्गदर्शक लोखंडी कमान व त्यावरील फलक खाली कोसळून कोणताही अपघात घडल्यास त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीस गंभीर दुखापत अथवा प्रसंगी जीवितहानीस सामोरे जावे लागू शकते. याबाबत संबंधित रस्ते विभागाने तातडीने पाऊले उचलून पाहणी करणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही व उपाययोजना करणे आवश्यक होते. तथापि तसे आजतागायत झालेले दिसून येत नाही. ही बाब खेदकारक आहे.
यास संबंधीत रस्ते विभागाची कामकाजातील हेळसांड वृत्ती व बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यावरतीच संबंधित सुस्त रस्ते विभाग जागा होणार की काय? सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवावा का लागावा? असा सवाल उपस्थित करून सदरच्या दुर्दशाग्रस्त रस्ते मार्गदर्शक लोखंडी कमानीच्या व त्यावरील फलकांच्या देखभाल दुरुस्तीबाबत संबंधित रस्ते विभागाने तातडीने योग्य ती आवश्यक कार्यवाही व उपाययोजना न केल्यास आणि यामुळे भविष्यात कोणतीही दुर्दैवी घटना अथवा अपघात घडल्यास त्याबाबत संबंधितांविरोधात कायदेशीर दाद मागावी लागेल अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.

अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ खारेपाटण

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: