… तर बंद करून टाका पोलीस स्टेशन आणि कोर्ट ; निलेश राणे कडाडले


मालवण : पुणे येथे पूजा चव्हाण नामक युवतीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर संशय निर्माण झाला आहे. मात्र पोलिसांकडून संजय राठोड यांना क्लिन चिट देण्याचा प्रयत्न सुरू असून या वरून भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुणाला ठार मारून सुद्धा हे हरामखोर मंत्रीपद मिरवणार असतील तर बंद करून टाका पोलीस स्टेशन आणि कोर्ट अशा शब्दांत निलेश राणे यांनी ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे.
       पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यात सध्या गाजत आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा या युवतीशी संबंध असल्याची ध्वनिफीत समोर आली असुन संजय राठोड सध्या भूमिगत आहेत. वनमंत्र्यांचा यामध्ये सहभाग दिसून येत असतानाही पोलिसांकडून त्यांना क्लिन चिट देण्याचा प्रयत्न होत आहे.
       पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल बाबतही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल जमा केला का? त्याची तपासणी केली का? त्यातून काही माहिती आली का? ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख होत असलेला मोबाईल आणि लॅपटॉप कुठे आहे? याबाबतही पोलिसांनी काहीच माहिती दिली नाही. शिवाय ऑडिओ क्लिपमधील संभाषणाबाबत आणि त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या तपासाबाबतही पोलिसांनी मौन पाळलं आहे. पोलिसांच्या पंचनाम्यानुसार पूजाने नैराश्यातून आत्महत्या केली. तर पूजाच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी शवविच्छेदन अहवालातील मोजकीच माहिती मीडियाला दिली आहे. तसेच पूजाने आत्महत्या केली. तेव्हा तिच्या सोबत घरात दोन व्यक्ती होते. पोलिसांनी त्या दोन व्यक्तिंबाबत मौन पाळलं आहे. त्यांच्याविषयी काहीही माहिती दिली नाही. या दोन व्यक्तींची चौकशी केल्यानंतर त्यातून काय माहिती समोर आली हे पोलिसांनी स्पष्ट केलं नाही. त्यामुळे या प्रकरणी पोलीस तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
       या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. “जे दिशा सालियनच्या बाबतीत घडलं तेच पूजा चव्हाणच्या विषयात घडत आहे. पुरावेच जर नष्ट केले जातील तर आरोपीला कधीच शिक्षा होऊ शकत नाही. कुणाला ठार मारून सुद्धा जर हे हरामखोर मंत्रिपदं मिरवणार असतील तर बंद करून टाका पोलीस स्टेशन आणि कोर्ट.” असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, मालवण

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: