झोळंबेतील आपदग्रस्तांचे पुनर्वसन ही माझी जबाबदारी – पालकमंत्री दीपक केसरकर

दोडामार्ग: झोळंबेतील आपदग्रस्त स्वतःच्या घरात राहायला गेलेले मला बघायचे आहेत. त्यांचे पुनर्वसन करणे ही माझी जबाबदारी आहे. त्यासाठी मी राज्याच्या मदत आणि पुनर्वसन खात्याची मदत घेऊन त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवणार, अशी ग्वाही पालकमंत्री तथा वित्त आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सासोली येथे झालेल्या कार्यक्रमात दिली.

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना पालकमंत्री केसरकर यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे धनादेश वितरित केले. त्यावेळी झोळंबेतील आपदग्रस्तही उपस्थित होते. झोळंबे दापटेवाडीत अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने बारा कुटुंबं विस्थापित झाली. धोका अद्याप टळला नसल्याने ती कुटुंबं घरांत न राहता गावांतील विठ्ठल मंदिरात राहताहेत. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, युवानेते आदित्य ठाकरे, आमदार वैभव नाईक यांनी त्यांची भेट घेऊन दरडग्रस्त भागाची पाहणीही केली. भूगर्भशास्त्रज्ञानी दिलेल्या अहवालानुसार तिथे राहण धोकादायक आहे. भविष्यात परिस्थिती पूर्वपदावर येणे शक्य असलं तरी कुटुंबं भयभीत झाली आहेत. त्यांची मागणी पुनर्वसनाची आहे. त्यांना शेती बागायती सांभाळून राहायचं असल्याने गावातचं पुनर्वसन करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या वेळी केसरकर यांनी त्यांच्या पुनर्वसनाची ग्वाही दिली.

दरम्यान, गणेशप्रसाद गवस यांच्यासोबत आपदग्रस्तांनी पालकमंत्री केसरकर यांची भेट घेऊन चर्चा केली. पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था भाड्याच्या घरात  करायची अथवा कशी याबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला .

प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग.  

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: