चक्रीवादळाचा पार्श्वभूमीवर महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश

हाय अलर्ट जारी, कोविड सेंटर साठी विजेची पर्यायी व्यवस्था करा

कणकवली : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टी भागात येत्या काही काळात ताऊते वादळ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत वादळी वारे आणि पावसामुळे वीज वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, तसेच मागील वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळ काळातही वीज वाहिन्या तसेच अन्य यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या वर्षी प्राप्त इशाऱ्यानुसार जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे महावितरण कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे सक्त आदेश दिले आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक पोल, वीज तारा व अन्य साहित्य उपलब्धते बद्दल मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अभियत्यासोबत तातडीची आढावा बैठक घेऊन आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी वीज पुरवठा बंद पडल्यास सर्व रुंग्णालये, कोवीड सेंटर्स विशेष करून व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिंजन यंत्रणा असणाऱ्या ठिकाणी प्राधान्याने वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे निर्देश दिले.
यासोबतच महावितरण कंपनीने सर्व जनतेला सावधानतेचा इशारा दिला असून, काही ठिकाणी वीज पुरवठा बंद करावा लागेल यावेळी संयम बाळगावा, वीज वाहिन्या स्वतः होऊन जोडणे, हाताळणे असे प्रकार करू नये असे आवाहन केले आहे. तसेच सर्व शासकीय कोविड सेंटर व खासगी कोविड सेंटर यांना देखील  विनंती करण्यात आली आहे की होणाऱ्या वादळामुळे महावितरण कंपनीच्या वीज पुरवठा यंत्रणेला धोका पोचू शकतो.वादळामुळे जर वीज पुरवठा खंडित झाला तर तो युद्ध पातळीवर सुरु करण्यासाठी महावितरणची यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे.  परंतु तरी देखील वीज पुरवठा अनिश्चित काळासाठी खंडीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी  पेशंटसाठी विजेची पर्यायी व्यवस्था करून ठेवण्यात यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली.     

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: