खारेपाटण बाजारपेठेत चार दुकानदारांना दणका

प्रत्येकी १० हजारप्रमाणे ४० हजाराची दंडात्मक कारवाई; दोन हॉटेल व्यावसायिकांना प्रत्येकी हजाराचा दंड; कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार यांची धडक कारवाई

खारेपाटण : कणकवली बाजारपेठे पाठोपाठ आता प्रशासनाने तालुक्यातील अन्यही महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये कोरोनाच्या नियमांच्या होणाऱ्या उल्लंघनप्रश्नी लक्ष्य केले आहे. कणकवली तालुक्यात काल कोरोनाचे १०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आज जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटणमध्ये दस्तुरखुद्द प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी खारेपाटण बाजारपेठेमध्ये फिरून तब्बल चार दुकानदारांना प्रत्येकी १० हजार रुपयेप्रमाणे ४० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. तर दोन हॉटेल व्यावसायिकांवर देखील प्रत्येकी १ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. खारेपाटणमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच कारवाई आहे. तर स्वतः प्रांताधिकार्‍यांनी खारेपाटणमधील एका घरात अनधिकृत पेट्रोलची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वतः ग्राहक बनून अनधिकृत पेट्रोलचा साठा छापा टाकून जप्त केला. प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी त्या घरात भेट देत पेट्रोलची मागणी केली. त्यावेळी पेट्रोल विक्री करणाऱ्याने प्रांताधिकार्‍यांना पेट्रोलसाठी आलेले ग्राहक समजून प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवलेले पेट्रोल दिले. यात त्या व्यक्तीकडील सुमारे ४० लिटर पेट्रोलचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पंचनामा करण्यात येत असून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली. सकाळच्या सत्रात प्रांताधिकार्‍यांनी अचानक भेट देत ही धडक कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत तहसीलदार आर. जे पवार, मंडळ अधिकारी मंगेश यादव, तलाठी सिंगनाथ, सरपंच रमाकांत राऊत व संकेत शेट्ये, रमाकांत राऊत, महेश कोळसुलकर, रफिक नाईक आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ, खारेपाटण

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: