“कोकण” हे गीत लवकरच येणार कोकणप्रेमींच्या भेटीला !

सिंधुदुर्ग सुपुत्र प्रणय शेट्ये यांचे शब्द आणि संगीत

सिंधुदुर्ग :
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिडवणे गावचा सुपूत्र युवा गीतकार, संगीतकार प्रणय शेट्ये ह्याने द्रौपदी क्रिएशन्सच्या माध्यमातून देशभरातील विविध ठिकाणच्या कलाकारांना एकत्र करुन कोकण या गीताची निर्मिती केली आहे. कोकणचे पर्यटन, परंपरा आणि लोकसंस्कृती या गीतातून उभी राहणार असून हे गीत रसिकांना आवडेल याची खात्री प्रणय शेट्ये यांनी दिली.
    कोकण, इंदौर, हैदराबाद, जळगाव, मुंबई अशा विविध भागातील कलाकार मित्रमंडळीना एकत्रित करुन मालवण येथे एका म्युझिकल ट्रिपचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रणयच्या शब्दसंगीत रचनांना संगीत संयोजन करून स्वरसाज चढवण्याचे काम सर्व टीमच्या सहाय्याने उत्कृष्टरित्या पूर्ण करण्यात आले. १४ दिवसांत एकूण ५ संगीतरचनांवर काम करताना या प्रवासात गायक सार्थक कल्याणी, आकाश शर्मा, प्रशांत मेस्त्री, रेखा मुनेश्वर तर वादक योगेंन्द्र पाटील, कौस्तुभ कसालकर, ओमकार सावंत, शेखर सर्पे यांचाही प्रत्यक्ष सहभाग होता.
    कोकणच्या पर्यटन, संस्कृतीला वाव देणार्या “कोकण” या गितात कोकणचे एकूण अंग मांडताना कोकणची ख्याती, संस्कृती, परंपरा ह्यांचा प्रसार जगभर करण्याची निखळ भावना व उद्देश ठेवत साकारलेले हे गीत लवकरच ‘द्रौपदी क्रिएशन्स’ ह्या युट्युब चँनेलवरून आपल्या भेटीला येईल.
    जगविख्यात संगीतकार ए.आर.रेहमान यांच्या विविध प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेला नामांकीत गायक सार्थक कल्याणी यांच्या सुरेल आवाजात कोकणावरचे हे लोकगीत स्वरबद्ध झाले असून, याची शब्दसंगीत रचना प्रणय शेट्ये ह्या कोकणपुत्राने केली आहे. या आधीही मराठी माध्यम शाळेच्या प्रसारासाठी केलेले शीर्षक गीत, ऑस्ट्रेलियन  गायिकेच्या आवाजात भारतीय व पाश्चात्य संगीत संयोजनाच्या मिलापातून साकारलेले वंदे मातरम् तसेच लॉकडाऊनमध्ये डीजीटल कॉन्फरन्स कॉलवर वेगवेगळ्या शहरातील कलाकारांना जोडून घडवलेले उभारी गीत अशा वेगळ्या धाटनीच्या संकल्पनांमुळे अनेक उदयोन्मुख कलाकार मंडळी प्रणयच्या उपक्रमात सहभागी व्हायला उत्सुक असतात. आताही कोकण ह्या गाण्याव्यतिरिक्त नित्यप्रार्थना, प्रेमगीत, विरहगीत आणि हलदी गीत ह्या चार थीमवर मित्रमंडळींना घेऊन प्रणय काम करतोय.
     कोकणात ही म्युझिकल ट्रीप घडवून आणायचे कारण तितकच खास होतं असे सांगताना प्रणय म्हणतो, ‘माझ्यासाठी संगीत म्हणजे दीर्घकाळ जगता येणार सुख आहे. जगण्यातली संवेदना, भावना, एकांत व त्याहीपलीकडे बघितल्यास संगीत हे आठवणी गुंफणारा एक धागाच आहे. आणि ह्या सर्वच बाबतीत, सर्वांगाने माझा कोकणही पुरेपूर भक्कम आणि सक्षम आहे. म्हणूनच कोकणवाली म्युझिकल ट्रीप साकरण्याचं स्वप्नही सत्यात उतरवता आलं आणि ते यशस्वी सुद्धा झालं.

 निलेश जोशी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: