कुंब्रलमधील दुसरा गट तहसीलदार आणि पोलिसांच्या दालनात

खडी वाहतुकीस गावाचा विरोध नसल्याची दिली माहिती

दोडामार्ग : परमे येथून कुंब्रलमार्गे गोव्यात जाणाऱ्या खडी वाहतुकीला आपला मुळीच विरोध नसल्याचे निवेदन कुंब्रल येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी येथील तहसीलदार अरुण खानोलकर आणि पोलिस निरीक्षक महेंद्र घाग यांना दिले. काही स्वार्थी लोक खडी वाहतुकीला विरोध करत आहेत आणि वाहतुकीला पूर्ण गावाचाच विरोध असल्याचे भासवत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात कुंब्रल-देऊळवाडी येथील काही मोजके लोकच खडी वाहतुकीला विरोध करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या निवेदनावर १४० जणांच्या सह्या आहेत.
परमे येथून परमे, कुडासे, पणतुर्ली मार्गे जाणारी वाहतूक काहींनी रोखल्याने खडी वाहतूक करणारे डंपर परमे, निडलवाडी, शिरवल, कुंब्रलमार्गे सासोलीकडे नेले जात होते. ती वाहतूक बंद करावी म्हणून काहींनी उपोषण केले होते. त्यानंतर त्यांची तहसीलदार, पोलिस आणि कंपनीच्या माणसांशी चर्चाही झाली होती. त्यावेळी तहसीलदार अरुण खानोलकर यांनी तो रस्ता सार्वजनिक व सरकारी असल्याने कुणालाही डंपर रोखता येणार नाही. तुम्ही सर्वानी एकत्र बसून चर्चा करा व तोडगा काढा असे सांगितले होते.
दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर कुंब्रलमधील गावकऱ्यांनी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांची भेट घेवून आपला वाहतुकीला विरोध नसल्याने आपण वाहतूक सुरु करू द्यावी अशी मागणी केली. त्यावेळी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांनी वाहतूक नियमानुसार अटी व शर्तीचे पालन करुन वाहतूक करा.त्यानंतर जर कुणी वाहतूक दांडगाईने रोखली तर तक्रार करा आम्ही कारवाई करू असे सांगितले. खडी, वाळू, जांभा दगड गौणखनिज प्रकारात मोडतात. त्यांची वाहतूक वेगवेगळ्या मार्गाने सोयीनुसार केली जाते. त्यांचा रूट(मार्ग) निश्चित नसतो. त्यामुळे परमेतून होणाऱ्या खडी वाहतुकीलाही निश्चित रूटची गरज नसल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
यावेळी कुंब्रल येथील देवस्थानचे मानकरी दिनकर सावंत व दाजी सावंत, माजी पोलिस पाटील सखाराम कदम, विशाल बोर्डेकर, निखील सावंत, विशाल सावंत, राजन कदम आदींनी ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार व पोलिस निरीक्षकांशी चर्चा केली.

प्रभाकर धुरी, कोकण नाऊ, दोडामार्ग

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: