कलावंतांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी!

पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर यांचा इशारा

कुडाळ : दशावतार चालक-मालक संघाशी आमचा कोणताही वाद किंवा त्यांच्याबद्दल गैरसमज नाही. पण पारंपारिक दशावतार कलावंतांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम कोचरेकर यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सांस्कृतिक संचालनालयामार्फत ज्या सुविधा आणि जे मानधन मिळते ते कलावंतांच्या बँक खाती थेट जमा करावे, अशी आमची मागणी त्यांनी केली.
आम्ही आमदार, खासदार यांच्याजवळ जाऊन भेटलो. पण आम्हाला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही. कलावंत आहोत म्हणून दशावतारी मंडळे आहेत हे सर्वजण विसरतात आणि ते लक्षात आणण्यासाठी कलावंतांची ताकद दाखवण्यासाठी आम्हाला हा प्रपंच करावा लागला. यापुढे कलावंतांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी असल्याचे पुरुषोत्तम कोचरेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सचिव चारुहास मांजरेकर, खजिनदार स्वप्नील नाईक, सल्लागार दत्तप्रसाद शेणई, कला-दिग्दर्शक रूपेश नेवगी, बावली नाईक, चारुदत तेंडोलकर, संतोष रेडकर, राजू हरियाण, राजेंद्र बांदेकर आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक संचालनालयामार्फत दशावतार कलावंतांना आणि मंडळाच्या मालकांना वर्षाकाठी ४ लाख रुपये दिले जातात. मात्र, ही रक्कम कलावंतांपर्यंत दिली जात नाही; दिली गेली तर ती तुटपुंज्या स्वरूपाची असते. दशावतार कलावंत हा कोठेही नोंदणीकृत नाही. त्याची नोंदणी व्हावी त्याला शासनाचे ओळखपत्र मिळावे. जेणेकरून भविष्यात त्याला मिळणाऱ्या सुविधा या ओळखपत्रावर असतील असे सांगून काही माहिती आम्ही गोळा करत आहोत कशाप्रकारे सांस्कृतिक संचालनालयाने बोगस पद्धतीने चुकीच्या दशावतार मंडळांना निधी दिला आहे हे उघड होणार आहे, असे यावेळी संघाचे सल्लागार दत्तप्रसाद शेणई म्हणाले.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: