एसटीचे ३३६ कर्मचारी कामावर रुजू

अजून ५ एस टी कर्मचारी निलंबित

विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची माहिती

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे.एसटी सपं आंदोलनात १४४० कर्मचारी सहभागी आहेत.तर नव्याने आज ५ कर्मचाऱ्यांचे निलंबित करण्यात आल्याने एकूण ११६ कर्मचारी निलंबित झाले आहेत.७० कर्मचारी अधिकृतपणे सुट्टीवर आहेत.तर ४६ कर्मचारी गैरहजर राहिले आहेत.आतापर्यंत रोजंदारीवर काम करणाऱ्या १५१ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली आहे.सरकारने पगारवाढ जाहीर केल्याप्रमाणे अध्यादेश काढला असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.
एसटीच्या प्रशासकीय कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कामावर रुजू होण्याची संख्या आज कमी झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपात सहभागी झालेले पण आता कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ३३६ आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अद्याप संप सुरुच ठेवल्याने बससेवा ठप्प आहे.त्यामुळे ग्रामीण भागातुन शहरांकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.
दरम्यान सिंधुदुर्ग विभागात एसटी कर्मचारी सरकारमध्ये विलीनीकरण करा, अशी भूमिका घेऊन अद्यापही संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटीच्या काही अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची भेट घेतली.होत असलेल्या आंदोलनाबाबत व हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचा आढावा दिल्याचे समजते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: