वसंत देसाई शास्त्रीय संगीत महोत्सव सुरु 

कुडाळ : पद्मश्री वसंत देसाई शास्त्रीय संगीत महोत्सवाला आज कुडाळच्या हॉटेल लेमनग्रास मध्ये सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या या शास्त्रीय संगीत महोत्सवात ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्याच्या गायिका पंडिता शुभदा पराडकर यांच्यासह देशभरातले २२ कलाकार सहभागी झाले आहेत. सकाळी साडे आठ ते रात्री १२ वाजेपर्यंत सलग १७ तास हि मैफिल सुरु आहे. मिती एंटरटेनमेंटच्या वतीने आयोजित केलेल्या या मैफिलींमध्ये दिवसभराच्या प्रहरानुसार रागप्रस्तुती करण्यात आली. शास्त्रीय संगीत रसिकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक आनंददायी पर्वणीच ठरला आहे. 

महान संगीतकार पद्मश्री वसंत देसाई सिंधुदुर्गचे सुपुत्र. कुडाळ जवळच सोनवडे हे त्यांचं गाव. गुंज उठी शेहनाई या त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातून त्यांची शास्त्रीय संगीतावरची पकड समजते. त्यांच्याच नावाने एखादा शास्त्रीय संगीत महोत्सव सिंधुदुर्गात घ्यावा अशी कल्पना मयूर कुलकर्णी आणि सिद्धेश कुंटे या तरुणांच्या मनात आली आणि कुडाळ मध्ये हा पहिलावहिला महोत्सव घ्यायचं ठरलं. कुडाळमध्ये हॉटेल लेमनग्रासच्या सभागृहात या महोत्सवाचा शुभारंभ ज्येष्ठ गायिका पंडित शुभदा पराडकर यांच्या हस्ते देवी सरस्वती आणि श्री गणेश यांचं प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन करून झाला. या उदघाटन समारंभात ज्येष्ठ रंगभूषाकार विकास कुडाळकर, संगीत शिक्षक राजन माडये, लेमनग्रास चे निलेश सामंत, ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट, मयूर कुलकर्णी, सिद्धेश कुंटे  असे मान्यवर सहभागी झाले होते. उपस्थित २२ कलाकारांनी सुद्धा श्री गणेशाचं पूजन करून आशीर्वाद घेतले. अशाप्रकारचा महोत्सव पहिल्यांदाच कुडाळमध्ये होत आहे. या महोत्सवामुळे एक प्रकारे परत एकदा अभिजात शास्त्रीय संगीत युवा पिढीमध्ये रुजवण्याच्या दृष्टीने हातभार लागेल अस आयोजक मयूर कुलकर्णी यांनी सांगितलं. 
उदघाटन सोहळ्याचं प्रास्ताविक मयूर कुलकर्णी यांनी केलं तर सूत्रसंचालन उदय वेलणकर यांनी केलं. उदघाटन सोहळ्यानंतर पंडिता शुभदा पराडकर यांच्या शिष्या औरंगाबादच्या अदिती कोरटकर आणि सावनी गोगटे यांच्या सहगायनाने मैफिलीलिचा श्रीगणेशा झाला. दोन्ही गायिकांनी मैफिलीत गायची संधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.  त्यांनतर या दोघीनी राग बिलासखरी तोडीन आपल्या गायनाला सुरुवात केली. उपस्थित रसिक शुद्ध त्यांच्या या गायनाने मंत्रमुग्ध झाले.  

या मैफिलीत ग्वाल्हेर, आग्रा आणि  जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पंडिता शुभदा पराडकर यांच्यासह सत्येंद्रसिंह सोळंकी यांचं संतूरवादन, अभिषेक काळे, गौरी बोधनकर, मानसी कुलकर्णी,  मुग्धा गावकर, ऋतुजा लाड, रोहित धाराप यांचं गायन तसेच  यशवंत वैष्णव (एकल तबला वादन), ओंकार अग्नोहोत्री व अभिनय रवंदे यांचं हार्मोनियम सहवादन, यज्ञेश रायकर यांच व्हायोलिन वादन, प्रसाद रहाणे यांचं सितारवादन  अशा देशभरातल्या २२ कलाकरांची कला रसिकांना अनुभवता आली. सर्व कलाकारांना संवादिनी साथ वरद सोहोनी, ओंकार अग्नोहोत्री, अभिनय रवंदे व निनाद जोशी करणार असून तबलासाथ तरूण लाला, यशवंत वैष्णव, रामकृष्ण करंबळेकर, संदीप पवार, सिद्धेश कुंटे व अद्वैत टाकळकर यांनी केली. एकंदरीतच हा पहिला वाहिला शास्त्रीय महोत्सव रसिकांसाठी सुरांची मेजवानी देणारा ठरला. 

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: