युवाचित्रकार अक्षय मेस्त्री यांच्या चित्राचे कणकवली पं.स.सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते अनावरण

सिंधुदुर्ग : आज शनिवार दि. ०८ फेब्रुवारी रोजी तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांच्या संकल्पनेतून युवाचित्रकार – अक्षय मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांसाठी पादचारी पुल व्हावे या मागणीसाठी रेखाटलेल्या चित्राचे अनावरण पंचायत समिती कणकवलीचे सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तळेरे येथील उपसरपंच दीपक नांदलस्कर, माजी सरपंच शशांक तळेकर,बापू डंबे, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव,शाळा समितीचे सदस्य शरद वायंगणकर,संजय खानविलकर,मुख्याध्यापक सी.के. कोरे, श्री.घुगरे, ग्रामस्थ शैलेश सुर्वे, राजू वायंगणकर, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी इ. उपस्थित होते.

तळेरे गावामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत स्वीटलँड ही इंग्रजी माध्यमाची शाळा, वामनराव महाडीक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई विद्यापीठाचे महाविद्यालय अशी शैक्षणिक संकुले आहेत. तळेरे पंचक्रोशीतील सर्वसाधारण वय वर्ष 5 ते 18 या वयोगटातील बहुसंख्य विद्यार्थी या शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षण घेत आहेत. त्यापैकी काही स्थानिक विद्यार्थी पायी ये – जा करतात, तर काही विद्यार्थी वाहनाने ये – जा करतात. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना नेहमीच महामार्ग ओलांडून ये – जा करावी लागते. पूर्वी महामार्गाची रुंदी कमी असल्याने महामार्ग ओलांडणे सहज शक्य होत होते. परंतू सद्यस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे महामार्गाची रुंदी विस्तृत झाली आहे. तसेच सदर महामार्गावरून भविष्यातील वाहतूक ही वेगवान असणार आहे. सदर शैक्षणिक संकुलाच्या दरम्यान महामार्गाच्या एका बाजूने तीव्र उतार असून या ठिकाणी पूर्वी अनेक अपघात व त्यामुळे जीवितहानी देखील झालेली आहे. त्यामुळे सदर क्षेत्र हे अपघात प्रवण क्षेत्र असून विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडणे अत्यंत धोकादायक व असुरक्षित आहे.यासाठी विद्यालयासमोर अंडरपास व्हावा यासाठी सुरुवातीपासून ग्रामस्थ व संघर्ष समितीची आग्रही मागणी होती. मात्र यामागणीची कोणतीच दखल नघेता महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. एकंदरीत सर्व परिस्थितीचा विचार करता त्यादृष्टीने शासन आणि प्रशासन स्तरावरून आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु अद्याप तशी कोणतीच कार्यवाही झालेली दिसून येत नाही. त्यामुळे अपघात प्रवणक्षेत्र असलेल्या विद्यालयासमोरील महामार्ग विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रस्ता ओलांडून जाणे धोकादायक झाला असून मूत्यूचा सापळा बनला आहे.

विद्यार्थी वर्गाला सहज, सुलभ व सुरक्षितपणे महामार्ग ओलांडता यावा याकरीता शैक्षणिक संकुलादरम्याने महामार्गालगत सेवामार्ग व महामार्गावर भक्कम, विस्तृत व सुरक्षीत असा पादचारी पूल होणे अत्यावश्यक आहे. याबाबत राजेश जाधव यांनी सर्वप्रथम आवाज उठवून शासन व प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत व त्याचा पाठपुरावा करीत आहेत. सदर मागणीची शासन आणि प्रशासन स्तरावरून योग्य ती दखल घेण्यासाठी व तातडीने उपाययोजना करणेसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न स्थानिक ग्रामस्थ व संबंधित पालकवर्गाने एकत्र येऊन करणे आवश्यक आहे.त्यादृष्टीने जनजागृती व्हावी याकरीता सामाजिक संदेश देणारे चित्र रेखाटण्याबाबत संकल्पना राजेश जाधव यांनी अक्षय मेस्त्री यांचेकडे व्यक्त केली होती. त्या संकल्पनेला आपल्या कुंचल्यातून मूर्तरूप देत पादचारी पुलाच्या आवश्यकतेबाबत सामाजिक संदेश देणारे चित्र अक्षय मेस्त्री यांनी रेखाटले आहे. या चित्राचे अनावरण प्रसंगी बोलत असताना दिलीप तळेकर यांनी राजेश जाधव यांच्या सामाजिक कार्याबद्दल व अक्षय मेस्त्री यांच्या चित्रकारीतेबाबत गौरवोद्गार व्यक्त करून विद्यार्थ्यांकरीता पादचारी पुल होणेसाठी सर्वांच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे याप्रसंगी सांगितले.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: