तळेरे तालुका निर्मिती प्रश्न धसास लावण्याच्या दूष्टिने वेगवान हालचाली

सिंधुदुर्ग : शासनस्तरावरती प्रलंबित असलेला तळेरे तालुका निर्मितीबाबतच्या जुन्या मागणीच्या प्रस्तावाला अधिक चालना देऊन हा प्रश्न धसास लावण्याच्या दूष्टिने वेगवान पाऊले उचलण्याचा निर्णय तळेरे तालुका निर्मिती समितीच्या आजच्या महत्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. तालुका निर्मितीबाबत वेगवान हालचाली करण्यासाठीची विशेष बैठक तळेरे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये समितीचे अध्यक्ष बापू डंबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. प्रस्तावित तळेरे तालुका निर्मितीबाबत महत्त्वपूर्ण सभा ग्रामपंचायत तळेरे येथील सभागृहात पार पडली. तळेरे दशक्रोशीतील देवगड आणि कणकवली तालुक्यातील गावांचा मिळून तळेरे नवनिर्मित तालुका व्हावा अशी १९८९ सालापासूनची मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर निर्णयास्तव प्रलंबीत आहे. सदर प्रस्तावाला चालना देण्याच्या दृष्टीने कृती समितीची सभा सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.या सभेला पंचायत समिती कणकवलीचे सभापती दिलीप तळेकर, तळेरे गावचे सरपंच सौ. साक्षी सुर्वे, प्रस्तावित तळेरे तालुका कृती समितीचे पदाधिकारी, तळेरे गावचे माजी सरपंच शशांक तळेकर व तळेरे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळेरे तालुका व्हावा व तळेरे गाव तालुका मुख्यालय व्हावे याकरीता तालुका निर्मितीबाबत सर्व आवश्यक त्या निकषांची पुर्तता यापूर्वी करण्यात आली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले तळेरे गाव दशक्रोशीचे केंद्रस्थान असून मोठे व्यापारी केंद्र आहे. तळेरे गावास १०० वर्षांपूर्वीची व्यापारी बाजारपेठ असून तळेरे गाव शहरीकरणाकडे वाटचाल करीत आहे. तळेरे गावात बाजारपेठ,मंगळवारी संपूर्ण दिवसभर भरणारा आठवडा बाजार, विविध उद्योग धंदे अशा व्यापारी सुविधा, राष्ट्रीयकृत बँका, पोस्ट ऑफिस, वित्तीय संस्था, एटीएम, फायनान्स अशा आर्थिक सुविधा, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, इंग्रजी माध्यमाची शाळा, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, नर्सिंग महाविद्यालय, मुंबई विद्यापीठाचे महाविद्यालय अशी शैक्षणिक संकुले, खारलॅंड, वनपाल,कृषी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसचिवालय, महा ई सेवाकेंद्र, पोलीस दुरक्षेत्र, बीएसएनएल, महावितरण, रेशन दुकान अशी शासकीय व निमशासकीय कार्यालये, व्यापारी व निवासी संकुले, शासकीय आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, खाजगी दवाखाने, औषध दुकाने, तपासणी प्रयोगशाळा अशा आरोग्य सुविधा, बसस्थानक, तीन व सहा आसनी रिक्षा सेवा, खाजगी मालवाहतूक वाहने अशा दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे तळेरे दशक्रोशीतील जनतेला सर्वसामान्य बहुतांश सोई सुविधांकरिता तळेरे हे गाव तालुका मुख्यालय म्हणून सोईस्कर ठरणारे आहे.

तसेच प्रस्तावित तळेरे तालुका निर्मितीमुळे समाविष्ट गावांचा विकास देखील अधिक गतिमान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित तळेरे तालुका निर्मिती होणे ही काळाची गरज बनली आहे. त्याअनुषंगाने सभेमध्ये प्रस्तावित तळेरे तालुका निर्मितीबाबत शासन मंजुरी मिळणेच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण चर्चा करण्यात येऊन पुढील ध्येयधोरणे निश्चित करण्यात आली. तसेच प्रस्तावित तळेरे तालुका निर्मितीबाबतच्या प्रस्तावाला चालना देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा व दक्षता समिती स्थापन करण्यात आली. सदर समितीच्या माध्यमातून प्रस्तावित तळेरे तालुका निर्मितीस चालना देण्याचे काम अधिक प्रभावीपणे करण्यात येणार असून तळेरे प्रस्तावित तालुका निर्मिती झाल्याशिवाय शांत न बसण्याचा एकमुखी ठराव सभेमध्ये घेण्यात आला. यावेळी माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, विनय पावसकर, प्रवीण अ.वरुणकर, उदय तळेकर, अशोक तळेकर, शरद वायंगणकर, राजू वायंगणकर, सुभाष तळेकर, सदाशिव पांचाळ, विश्वनाथ पावसकर, अनिल मेस्त्री, रवी भोगले, शैलेश सुर्वे, राजेश भोगले, मंगेश मुद्रस, संजय खानविलकर, मारुती वळंजू, संतोष नारकर, प्रदीप घाडी, सागर डंबे, निलेश सोरप, प्रवीण श.वरुणकर, मनोज तळेकर, सुयोग तळेकर, आप्पा वरवडेकर, विशाल वरवडेकर, बाबू मेस्त्री, येसुदास पटेल इ. ग्रामस्थांनी तळेरे तालुका निर्मितीबाबत सर्वतोपरी सहकार्य करून प्रस्तावित तळेरे तालुका निर्मितीबाबत निर्धार व्यक्त केला. सुरुवातीला बापू डंबे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले तर शेवटी राजेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: