श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा…मनाला भावणारा सोहळा..!

Sharing is caring!

परवा खूप कामात होतो. सारखा वैताग होत होता. अशातच मोबाईल खणखणला मनाचा त्रागा करितच फोन रिसीव्ह केला. समोरुन मित्र बोलत होता. पहिलाच प्रश्न त्याने केला यात्रेक येतलस ना..? तुटक तुटक बोलून मी फोन ठेवला. त्या परिस्थितीतही त्याचा तो प्रश्न ऐकून कामावरचा सगळा ताण विसरुन मन “कुणकेश्वर यात्रा” या दोन शब्दांभोवती फिरत राहिले.
तसं नवीन वर्षाचं कॅलेंडर हाती पडल्यावर सर्वात आधी माझ्याकडून पाहिली जाते ती महाशिवरात्री यात्रेची तारीख आणि मग तिथपासून महाशिवरात्रीपर्यंत फक्त आणि फक्त कुणकेश्वर यात्रेची ओढ मनाला लागलेली असते.
अगदी लहानपणापासून जत्रा या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे कुणकेश्वर यात्रा असाच आमचा समज झालेला आहे. लाखो शिवभक्त, गावोगावच्या देवस्वाऱ्या ज्या स्वयंभू कुणकेश्वराच्या दर्शनाला येतात. त्यांचा पाहुणचार यजमान म्हणून आम्हा ग्रामस्थांना करावयास मिळतो. तेव्हा आम्ही किती भाग्यवान आहोत असे मनोमन वाटते. प्रत्येक शिवभक्ताच्या मनात कुणकेश्वर यात्रेला एक अढळ असे वेगळे स्थान आहे. कित्येक पिढ्यान पिढ्या या यात्रेच्या निमीत्ताने कुणकेश्वरची वारी करित असतात. जमाना बदलला स्मार्टफोनवर बोटं फिरवून तुम्ही जग पाहू शकता. पण आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलात तरी यात्रा सर्वार्थाने अनुभवण्यासाठी पाय आपोआप कुणकेश्वरच्या दिशेने चालू लागतात आणि आपण पोहोचता त्या कोकणच्या काशीत जेथे आपला प्रेरणास्त्रोत आहे.

थोडसं काही वर्ष मागे जातो आमच्या बालपणी मराठी शाळेत असताना यात्रा जवळ आली की आमची एक वेगळीच मजा असायची. यात्रेच्या महिनाभर आधी कुणकेश्वरात एका ठरावीक भागातून ठाकर बांधव दाखल होतात. ते आले म्हणजे यात्रा जवळ आली असा आम्ही त्यावेळी समज करुन घेतला होता. नंदिबैलवाला आला की त्यात आणखी भर पडे. मग दिवसभर त्यांच्या मागून आम्हा पोरांचा गलका असे. मग त्यासाठी घरातल्यांची बोलणीही खावी लागत. यात्रेच्या आदल्या दिवशी आमच्या शाळेत पोलीसांचे पथक दाखल व्हायचे त्यांच्याविषयी तर तेव्हा एक वेगळे कुतुहल असे. त्यांचे कपडे, बंदुका इ. आम्ही एकसारखे न्याहाळत असू. मग शिक्षक येउन आम्हा मुलांसमोर त्या पोलीसांना म्हणत तुमची एक वेताची काठी ठेऊन जा हि पोरं खूपच दंगा करतात हल्ली. मग शिक्षक निघून गेल्यावर त्या पोलीसकाकांकडे आपण काठी देऊ नका यासाठी केलेली विनवणी ते सर्व आता आठवलं ना की मनातच हसू येतं. खरच किती भारावलेले यात्रेच्या कालावधीतले ते दिवस असायचे. कुणकेश्वर यात्रेने एक प्रकारचे गारुडच आमच्या मनावर केलेले आहे. म्हणजे आपण कितीही दूर कामात अडकलेले असा पण कोणा मित्राचा फोन आला आणि ” काय रे यंदा यात्रेक येतलस की नाय” अशी विचारणा झाली की तोंडून आपसूकच “म्हणजे काय येणारच” असे शब्द बाहेर पडतात. तुम्ही व्यवहाराच्या बाबतीत कितीही काटेकोर असा, तुम्हाला कधिही लॉटरी लागत नाही हे तुम्ही जाणता पण यात्रेला आल्यावर तुम्हाला लॉटरीवाला दिसला की तुम्ही आपोआप ते तिकीट खरेदी करता, एखादी वस्तू मुंबईसारख्या ठिकाणी सहज आणि स्वस्त उपलब्ध होणारी आहे पण ती यात्रेत विकत घेतल्यावर येणारा फिल हा वेगळा असतो. त्यावेळी तुमच्यातला व्यवहारीपणा याच्या जराही आड येत नाही हे विशेष. तुम्ही वयाने कितीही मोठे असाल एरव्ही एक प्रोफेशनल लाईफ जगत असाल पण फनी गेम्समधे रिंगा टाकताना, नेम धरुन फुगे फोडताना, आकाश पाळण्यात बसताना तुम्ही कधी लहान होउन जाता तुमचं तुम्हालाच समजत नाही. हि सर्व जादू त्या कुणकेश्वर यात्रेची तुमच्यावर झालेली असते. आमच्या कुणकोबाच्या भेटिसाठी इतर गावचे देव येतात हि कल्पना जरी मनात आली ना तरी देवस्वारी सोबत वाजणारे ढोल ताशा आमच्या मनात वाजू लागतात. मग यंदा कोण-कोणत्या गावच्या देवस्वाऱ्या येणार आहेत. कोणता देव किती वर्षांनी येणार आहे. त्यांचा मार्ग कोणता ई. ची चौकशी सुरु होते. आणि गावची जुनी-जाणती मंडळी त्या येणाऱ्या  देवतांच्या प्रवासातील काही रंजक माहीती सांगून कुतुहलात आणखी भर पाडतात. एका खांबकाठीला वरती एक मुखवटा त्याच्या सभोवताली गुंडाळलेल्या साड्या आणी ती खांबकाठी खांद्यावर घेतलेले संचारधारी एक विशिष्ट प्रकारचा पदन्यास करित मोठ्या आवेशात धावत कुणकेश्वर शिवलींगापाशी जाऊन स्थिर होतात व दर्शन घेतात. तेव्हा भेटिची ओढ ओढ म्हणतात ती नेमकी काय हे लक्षात येते. याच तरंग देवता यात्रेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अमावास्येला समुद्रस्नानासाठी जातात ते पाहणे म्हणजे एक विलक्षण अनुभव असतो.

समुद्रस्नान करण्यापूर्वी भाविक समुद्राला नारळ अर्पण करतात ते नारळ लाटांमधे पोहत जाऊन मिळविणे आणि नंतर कोणाला किती नारळ जमविता आले यांचा हिशेब घालताना जी मजा येते ना ती खरच शब्दात नाही मांडता येत. एरव्ही ज्यांची भजने फक्त सीडीवर असतात किंवा त्या भजनी बुवांना सीडीच्या कव्हरवरच पाहिलं असतं असे नामवंत भजनी बुवा कुणकेश्वरच्या सभामंडपात आपले स्वर आळवत असताना त्यांना गर्दितून डोकावून पाहताना मिळणारा आनंद हा एका वातानुकुलीत थिएटरमधे बसून कोण्या प्लेबॅक सिंगरचा कार्यक्रम पाहताना होणाऱ्याआनंदापेक्षा कैक पटिने मोठा असतो. यात्रेमधे फिरत असताना बायकांचा तो दुकानदारांशी दारावरून होणारा संवाद त्यांना समजावता समजावता दुकानदाराची उडालेली तारांबळ पाहिली की असे वाटते की जागतिक बाजारपेठेत वापरले जाणारे “महागाई’ मंदी” यासारख्या शब्दांचा काहीच परिणाम या यात्रेतल्या अर्थशास्त्रावर झालेला नसावा. यात्रेत कोणी व्यापारी आपल्याजवळील वस्तूचे एका वेगळ्या ढंगात बोलून मार्केटिंग करताना प‍ाहिलेना की मार्केटिंगसाठी लाखो रुपये खर्चून शिक्षण घेणारेही त्याच्या त्या बोलबच्चन समोर फिके ठरतात. तुम्ही कितीही मोठे शिकलेले असाल तुम्हाला अंधश्रद्धा म्हणजे काय हे सुद्धा चांगलं ठाऊक आहे. पण यात्रेत फिरताना भविष्य बघणारे पोपटावाले दिसले की लगेच मित्राकडे पाहून “तुझा कार्ड काढूयात काय” असे बोल आपसूकच तोंडातून निघतात.

कुणकेश्वर यात्रेच्या अशा कित्येक लोकांच्या कित्येक वेगवेगळ्या भावना आहेत. लिहायला गेलो तर शब्द अपुरे पडतील. पण स्वतः अनुभवाल तर तुम्हाला त्या सर्वात जास्त कळतील. माणसं बदलत चालली, जग बदलत चाललं, प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरही बदललं पण आत बसलेला तो माझा कुणकोबा युगान्युगे अगदी तसाच आहे. उद्या कदाचित मी, तुम्ही नसू पण माझा देव पुढची युगान्युगे भक्तांची गाह्राणी ऐकत तसाच सागरकिनारी बसलेला असणार आहे. शिवभक्त आणि कुणकेश्वर यांमधे असणारं हे नातं कधीही संपणारं नाही, संपत नाही उलट कुणकेश्वर यात्रेच्या निमित्ताने ते पुन्हा पुन्हा बहरत राहतं.

हेमंत उर्फ बबलू पेडणेकर/साईनाथ गावकर

कुणकेश्वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: