खेळे आले मंदिरासी….!

Sharing is caring!

देवगड : महाशिवरात्रीनंतर सर्वांना वेध लागतात ते म्हणजे शिमगोत्सवाचे तिकडे शहरात शिमगा हा दोनच दिवसांचा असतो आणि आजच्या शहरातल्या पिढीला शिमगा म्हणजे डि.जे. च्या गोंगाटात धुडगुस घालणे व रासायनिक रंगाची उधळण करणे एवढ्यापर्यंतच शिमग्याची ओळख असते. परंतु शिमग्याची खरी परंपरा ही कोंकणातच जपली जाते. कोंकणातल्या प्रत्येक गावात शिमगा अर्थात होळी उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. प्रत्येक गावच्या स्वतःच्या अशा होळीच्या वेगवेगळ्या परंपरा असल्या तरी एकंदरीत उत्सवाचे स्वरुप हे एकच असते.
या उत्सवाची सुरुवात होळी पौर्णिमेला होळीचे झाड तोडून होते. येथे प्रत्येक गावात परंपरेनुसार होळीचे झाड असते. उदा. आंबा, पोफळी, माड, ई. माझ्या कुणकेश्वर गावची होळी ही आंब्याच्या झाडाची असते. होळीच्या पौर्णिमेला समस्त गावकरी गावच्या मांडासमोर एकत्र जमतात. त्यानंतर ठरल्याप्रमाणे ज्याठीकाणचे झाड तोडायचे आहे त्याठीकाणी वाजत गाजत ग्रामस्थ जातात. तेथे श्रीफळ ठेऊन गाह्राणे केल्यावर मानकय्रांमार्फत पहीला घाव घातला जातो. होळी तोडून झाल्यावर ती वाजत गाजत “होळदेव रे होळदेव” अशा नामघोषात ठरलेल्या ठिकाणी आणून उभी करतात व मानकय्रांच्या हस्ते पूजा झाल्यावर होळी पेटवून त्याभोवती प्रदक्षिणा करुन नमस्कार करतात. दुसय्रा दिवशी गावात सण साजरा केला जातो. धुळवड होईपर्यंत प्रत्येक रात्री गावच्या मांडावर ग्रामस्थ एकत्रित जमतात. होळीच्या साक्षीने तेथे गावचे न्याय निवाडे होतात या होळीच्या मंडावरती कुणीही खोटं बोलत नाही. कोंकणी माणसाला खरं बोलण्यास भाग पाडण्यासाठी गितेवर वगैरे हात ठेवायला सांगितलात किंवा इतर कुणाची शपथ घ्यायला सांगितलात तर तो मानातल्या मनात ‘देवा माका माफ कर’ असं म्हणून बिनधास्त शपथ घेउन खोटं बोलेल पण होळीला हात लावून कुणीही गावकरी खोटं बोलण्याची हिंमत करत नाही. त्यामुळे गावच्या महत्वाच्या प्रश्नांवर येथे चर्चा होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे कोणताही अजेंडा नफिरवता किंवा कुणालाही न बोलवता परंपरेनुसार लागणारी ही ‘गावची वार्षीक सर्वसाधारण सभा’ असते असे म्हणता येईल.
शिमग्याच्या निमीत्ताने श्री देव कुणकेश्वराचे “निशाण” प्रत्येक गावाघरात फिरते. निशाणासोबत “टिपोलो” हा आगळा वेगळा टिपय्रांचा प्रकार खेळला जातो. टिपोलो हा ढोलाच्या तालावर नाचायचा असतो कमरेला साड्यांचे तरंग नेसलेले खेळगडी गोल जोडीने उभे राहतात. त्यानंतर ठराविक नाचायचे बोल म्हटले जातात. ते दोन तीन वेळा म्हटले की ढोल वाजून लागतात. सुरुवातीला हळू हळू नाचून मग ढोलाचा नाद जसा वेगात होईल तसे वेगात नाचायचे ते अगदी कमाल वेग गाठे पर्यंत. नाचाच्या सुरुवातीलाच जे बोल बोलतात त्यावरुनच कोणती स्टेप करायची हे खेळगड्यांना समजते त्यानुसार स्टेप बदलत असते.
उदा.
ठायचे ठाय गडी पालट गे…
आपला गडी वोळखून घे…
यामधे तिथल्या तिथे पालटून गोल फिरुन परत आपल्या गड्याकडे येऊन टिपरी माराची.
तेलाचा माखन कुकवाचा टिळा…
केलेला शृंगार शोभून गेला…
यामधे नाचताना एक टिपरी दिली की तेलाचा माखन कपाळाना लावताना दाखवायचा नंतर दुसरी टिपरी दिली की कुंकवाचा टिळा लावायचा.
झारंग्या रंगला फासक्या तुटला…
उडोनी गेला भुर्र कावळा…
यात हातवारे करुन फासकीतून कावळा उडून गेला हे दाखवायचं
असे ई. निरनिराळे प्रकार या टिपोलोद्वारे सादर करण्यात येतात. कुणकेश्वरचे निशाण आपल्या घरी आले म्हणून प्रत्येक ग्रामस्थ आपापल्या परिने त्याचे स्वागत सेवा करतात.
“शिमग्याची सोंगे” ही काही कोंकणातील माणसांना नविन नाहीत. शिमगा आला की येथे प्रत्येक वाडीत आवाटात कलावंत उभारुन येतात. लहानगी पोरं खाऊला पैसे मिळतील म्हणून एक एक सोंग नेसतात मग कुणी आपल्या बहिणीचा झबला घालतो, कुणी काळी पिंजर ओठावरती फिरवून प्रोफेशनल मेकअप मॅनला ही लाजवेल अशी सुरेख मिशी रेखाटतो अशी जमेल तशी सोंग घेऊन हातात झांज घेऊन हे कलाकार आपल्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी वाडीतल्या एकेका घरासमोर जातात. आणि मग सुरु होतो नाच. ही गाणी सुद्धा किती मजेशीर आणी एका कडव्याची असतात बघा
गोपाळकृष्ण म्हाराज की जय…….
काळी टिकली गंधकाची
पोरी भाषा बोलते गुजराती
रडू नको नशीबाला
तुला नवरा मिळेल सायकलवाला
गोपाळकृष्ण म्हाराज की जय…….
दुसरं गाणं-
गोपाळकृष्ण म्हाराज की जय…….
ओ अशी मांजर कुणाची मारु नकवा
खुटावरचो कावळो तो तुझो मावळो…
चुलीतली रखा ती तुझी आका…
हाटेलातली भजी ती तुजी आजी…
ओ अशी मांजर कुणाची मारु नकवा
गोपाळकृष्ण म्हाराज की जय…….
तिसरं गाणं-
गोपाळकृष्ण म्हाराज की जय…….
येंचू चावला बोटी
कळा गेली मानगुटी
आता धाव रे गण्या
वैद्याला बोलवायला
वैद्य राहतो कोठे
चिचेच्या कोकणात
गोपाळकृष्ण म्हाराज की जय…….
चौथ गाणं-
गोपाळकृष्ण म्हाराज की जय…….
समुद्र किनारी बंगला बांधीला
त्या बंगल्याला हवा नको
त्या बंगल्यावर चित्र काढीले
पोपट चिमणी मोर गो
त्या पोपटाने भरारी मारली
आणला मोत्याचा हार गो
त्या हाराने बंगला सजविला
दिसतो किती छान गो
गोपाळकृष्ण म्हाराज की जय…….
अशी कितीतरी गाणी आहेत. यात एक बाब कॉमन ती म्हणजे गाणं हे ग्रामीण धाटणीपासून ते अगदी शांताबाई रिमीक्स पर्यंत कोणतही असो त्याची सुरवात आणि शेवट “गोपाळकृष्ण म्हाराज की जय” पासूनच होणार. कुणकेश्वर गावात शिमग्याला “तमाशा” सादर केला जातो. तमाशा ही एक लोककला! त्यात वग आला गवळण आली कथानक ई. आलं पण शिमग्यातील तमाशा हा प्रकार एवढ्या विस्तृत प्रमाणात सादर होत नाही तरीही त्याला तमाशाच म्हणतात. या तमाशाला परंपरा असते तमाशा म्हणजे वाडीतील ग्रामस्थाचा पंरपरागत चालत आलेला शिमग्यातील नाच गावातील ज्या वाडीने तमाशा काढायचा आहे त्या वाडीने तो गावच्या मांडासमोर प्रथम सादर करावयाचा असतो. त्यानंतर तो गावात सर्व घरात फिरतो. यातील कलावंत हा वाडीतीलच कोणी पुरुष कलावंत स्त्रीच्या वेशात तमाशासाठी उभा राहतो. त्याचा मेकअप सुद्धा वाडीच्या मांडावरती केला जातो व दिवसभराचा कार्यक्रम संपला की तो वाडीच्या मंडावरतीच उतरवतात. या तमाशाची गाणी ही तशीच पारंपारिक असतात.
उदा.
1
मुळ आले सख्या सासरी
उद्या मी जायाची जायाची
परि दर्शन होईल सख्या तुमचं करण्यासी।
तुम्हा साठी आणिल्या
लाडू हो करंज्या ताज्या अहो ताज्या…
एक ताटी बसू भोजना
प्राणसख्या माझ्या…
तुम्ही गेल्यावर मी इथे कशाला राहू अहो राहू
अंगासी लावीते हात अडवू नको
सखे ग जि जि.
2
प्राणसख्या ईच्छा माझी पुरवा
मिठाई घ्या खायाला हलवा….
घ्या घ्या बुंदिचे लाडू
त्याच्यावर सांडगे कडू…
घ्या घ्या लाडु अन हलवा
सख्या मला झुल्यावर झुलवा
3
दामकर खुशकर हशीव सख्या
रे मला मोटार गाडीमधे बसवा…
मोटार गाडीचा रंग आहे हिरवा
मला बसून कुलाब्याला फिरवा….
4
अंगणात फुलल्या जाई जुई
जवळी ग माझा पती नाही
चैत्र शुक्लाची हि नवलाई
जणू मोहरली अंबराई
जणु मोहरली अंबराई.
अशी तमाशातली गाणी फक्त आणि फक्त शिमगोत्सवातच कानावर पाडतात. वाडीचा तमाशा काढायचा मूळ उद्देश हा शिमग्यानंतर “पॉस” करण्यासाठी म्हणून असतो. पॉस म्हणजे गावातील सर्वांना वाडी मांडावर एकत्रित बेलावून त्यांना जेवण करुन वाढणे होय. माझा स्वतःचा तर्क असा की पॉस हा मुळ मराठी शब्द पोषणपासून तयार झाला असावा पोषण=पोसणे=पॉस मालवणीत सांगायचे म्हणजे ‘वाडीन ठराविक वर्षातसून एक दिवस सगळ्यांका पोसायचा,… मूळ उद्देश जरी हा असला तरी आता वाडीतील काही सामाजीक कार्यासाठी निधी जमवण्यासाठीसुद्धा शिमग्यात खेळ काढले जातात. या निधीतून मग शाळेसाठी वर्गखोल्या बांधणे, मंदिरांची उभारणी इ. कामे या तमाशातून मिळणाय्रा पैशातून केली जातात. तमाशाच्या निमीत्ताने वाडीतील सर्व मंडळी गावातील प्रत्येक घरात जातात. पाहुणचार घेतात. विचारांची देवाणघेवाण होते. बांधीलकी जोपासली जाते. प्रत्येक घरात तमाशा सादर झाल्यावर त्या घरची सुवासिनी तळी घेऊन तमाशात स्त्री झालेल्या पात्राचे औक्षण करते. मग तमाशातील गायक गाऊ लागतो.
खेळे आले मंदिरासी
पाठवण करु त्यांची
पाठवणी करु त्यांची
घरची लक्ष्मी ओवाळीते
ओवाळीते एकाएकी
देवा गोविंदाच्या राशी
शंभू म्हणे आस धरा
आज वर्षे येऊ घरा
खेळे येती वचन देती
तुम्ही नांदा सुख-संपत्ती…

याचा अर्थ असा की वर्षातून एकदा हे शिमग्यातले खेळे तुमच्या घराकडे येतात त्यांचा तुम्ही योग्य मानपान करता त्यामुळे वर्षभर तुम्हाला सुख संपत्ती लाभो याचे वचन देवामार्फत तुम्हास देत आहोत.
कुणकेश्वर गावातील शिमगोत्सवाचा शेवट हा गावाने मांडावर ठरविलेल्या दिवशी धुळवड साजरी करुन यालाच ग्रामीण भाषेत ‘धुळ मारुन’ होतो. धुळवडीच्या दिवशी श्री देव कुणकेश्वराला पालखीत विराजमान करुन होळीच्या स्थानापर्यंत मिरवणुकीने वाजत गाजत आणतात. महापुरुष स्थानापाशी श्रीं ची मूर्ती विराजमान करुन पुजा अर्चा केली जाते. त्यानंतर पारंपारिक टिपोलोचा खेळ सादर करुन धुळवड साजरी होते. यावेळी ग्रामस्थांना हळद मिश्रीत पाणी तीर्थ म्हणून देतात व गावच्या शिमगोत्सवची सांगता होते.
कोंकणातील इतर गावांप्रमाणेच कुणकेश्वर गावातही शिमगोत्सव गावच्या परंपरेला अनुसरुन साजरा केला करतात. शिमग्यातील येणाय्रा सोंगांचा यथोचित मान सन्मान प्रत्येक घरातून केला जातो. शिमग्यातील हि सोंगे म्हणजे कुणि दारावर भिक मागण्याच्या उद्देशाने आलेले याचक नसतात तर. आपल्या कामधंद्यातून वेळ काढून परंपरा जपण्यासाठी ही मंडळी फक्त शिमग्याच्या निमीत्तानेच आपल्या घरी येतात. जमा खर्चाचा ताळमेळ न घालता तुम्ही जे देता त्यात आनंद मानतात. त्यांचा सर्वांनीच यथाशक्ती सन्मान करावा. शिमग्याला घरासमोर आलेल्या कुणालाही रिकाम्या हाताने परत पाठवू नये. कारण नकळत का होईना संस्कृती जपण्याचं काम हे खेळे करत असतात. व आपल्याला सुख संपत्ती समाधान लाभो हेच वचन देत असतात.

माहिती स्त्रोत- हेमंत उर्फ बबलू पेडणेकर(कुणकेश्वर)

साईनाथ गावकर, कोकण नाऊ देवगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: