अवजड वाहतुकीमुळे आंबोली घाटातील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक 

Sharing is caring!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातला महत्वाचा असा आंबोली घाट सध्या धोकादायक बनलाय. याला कारण आहे ते म्हणजे  चोरला आणि  अनमोड या गोव्यातील   घाट रस्त्यावरून  अवजड वाहतूक बंद असल्याने ही संपूर्ण वाहतूक आंबोली मार्गे होत आहे.  या वाहतुकीमुळे या घाटातील ब्रिटिशकालीन पूल कमकुवत होऊन इथून वाहतूक करणं धोकादायक बनलंय. या पुलांची डागडुजी झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा आंबोलीवासीयांनी दिला आहे.

सध्या चोरला आणि अनमोड या गोव्यातील घाट रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद असल्याने ही संपूर्ण वाहतूक आंबोली मार्गे होत आहे या मार्गाने मोठ्या प्रमाणात मायनिंग ट्रक बॉक्साइट वाहतूक करत आहेत.  बाराचाकी, चौदा चाकी, सोळा चाकी असे अति वजन असलेले मोठमोठे ट्रक आंबोली मार्गे वाहतूक करत आहेत, ज्यामुळे आंबोली घाटातील ब्रिटिशकालीन पुलांना धोका निर्माण झाला आहे. दिवसाकाठी जवळपास शंभर ते दीडशे मायनिंग वाहतूक करणारी अवजड वाहने आंबोली घाटमार्गे येत जात असून या वाहनांमुळे रोज आंबोली घाटामध्ये वाहतुकीचा खोळंबा होत आहे, अनेक अपघातही होत आहेत. शिवाय या वाहनांच्या अतिभारामुळे येथील काही जुनी व जीर्ण झालेली पुले कोसळण्याच्या मार्गावर आहेत. आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना युवा अध्यक्ष अजित नार्वेकर यांनी याबाबत या पुलांची पाहणी केली, व शासनाला जाग आणण्यासाठी लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आंबोली घाटातील पुलेही ब्रिटिशकालीन असून ती जीर्ण झाली आहेत व त्यांची डागडुजी गेली कित्येक वर्ष झालेली नसून याकडे बांधकाम विभाग पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचा आरोप अजित नार्वेकर यांनी केला आहे. अजित नार्वेकर यांनी या पुलाच्या खाली जात, पुलाला पडलेली मोठाली भेग निदर्शनास आणून दिली असून या घाट मार्गावरून होत असलेली अवजड वाहतूक जर लवकर बंद केली नाही तर घाट रस्त्यावरील जीर्ण पुले कोसळून जिल्ह्याशी आंबोलीचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली आहे तसेच येथील पर्यटनही पूर्णपणे ठप्प  होईल असेही त्यांनी सांगितले आहे.

गेली अनेक वर्षे या पुलाबाबत निर्णय न झाल्याने हे पूल दिवसेंदिवस धोकादायक बनत असून या पुलासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करून हे पूल बांधण्यात  यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या पुलाची उंची चाळीस फूट असून त्याला चाळीस फुटांची मोरि आहे, हे पूल कोसळून जर अपघात झाला तर मोठी जीवित हानी होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या नेत्यांनी याबाबत बांधकाम विभाग, पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच वाहतूक पोलिसांना निवेदन देऊन ही अवजड वाहतूक थांबविणार असल्याचे सांगितले आहे जर ती निवेदनाद्वारे थांबली नाही तर आंदोलन करून थांबविण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाचे या मार्गाच्या डागडुजीकडे  पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असे मत आंबोलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थानीं व्यक्त केले आहे.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: